रामनवमीच्या उत्सवानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलेल्या भाविकांनी साईचरणी भरभरून दान दिलं. ९ ते ११ एप्रिल या तीन दिवसांच्या साई बाबांच्या रामनवमी उत्सव काळामध्ये पावणेतीन लाख साई भक्तांनी साईबाबांचे दर्शन घेतलं. शिर्डी हे तिरुपतीनंतरचं सर्वात श्रीमंत मंदिर संस्थान मानलं जातं.
शिर्डीत आलेल्या भाविकांनी साईबाबांच्या चरणी ४ कोटी ५७ लाख रुपयांचे दान साई चरणी अर्पण केलं. तसेच यामध्ये ऑनलाइन देणगी, सोन्या चांदीचा समावेश आहे. याउत्सव काळामध्ये १ लाख ६६ हजार भाविकांनी प्रसादालयामध्ये प्रसादाचा लाभ घेतला आहे. रामनवमीच्या दिवशी या मंदिरामध्ये मोठी गर्दी होती. साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक शिर्डी येथे येत असतात.
गेली दोन वर्षे करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात कडक निर्बंध लागू कऱण्यात आले होते. या निर्बंधांमुळे राज्यातली मंदिरं बंद होती. त्यामुळे भाविकांना प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ घेता आला नव्हता. पण आता निर्बंध शिथिल झाल्याने दोन वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर भाविक शिर्डीतल्या साईमंदिरात दर्शनासाठी आले होते.