तहसिलदार विजय पाटील बारामती
बारामती दि. 22: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त बारामती तालुक्यात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तालुक्यामध्ये हा उपक्रम विविध कार्यक्रम घेवून यशस्वीपणे राबविण्यात यावा, अशा सूचना तहसिलदार विजय पाटील यांनी सर्व कार्यान्वयन यंत्रणांना दिल्या.
स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सवा निमित्त ‘ हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्याबाबतच्या तयारीची बैठक तहसिल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला विविध यंत्रणांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, सर्व शासकीय तसेच निमशासकीय विभाग प्रमुख व खाजगी आस्थापनांनी आपापल्या स्तरावर ‘हर घर तिरंगा ‘हा उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत राबवून तालुक्यातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज लावण्यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रध्वज वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. नागरिकांना राष्ट्रध्वज घरावर फडकविण्यासाठी प्रोत्साहित करावे. तालुक्याच्या मुख्यालयी ७५ फूट उंच राष्ट्रध्वज उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य ते नियोजन करावे, असेही त्यांनी सूचित केले.
या कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरावरील शासकीय कार्यालयात वृक्षारोपण करण्यात यावे. तालुक्यातील पुरातत्वदृष्ट्या महत्वाची वारसास्थळे देखभाल करण्याकरिता ऐतिहासिक वारसा जपवणूक करणाऱ्या संस्थांना दत्तक देण्यात यावीत. शालेय, महाविद्यालय स्तरावरून विविध स्पर्धा, निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धां व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. शासकीय इमारतीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे बोधचिन्ह लावावे. या निमित्ताने स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. तालुक्याच्या मुख्यालयी संविधान स्तंभाची उभारणी करण्यात यावी, असेही ते म्हणाले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत सर्व कुटुंबांनी या उपक्रमात सहभागी होऊन तिरंगा ध्वज अभिमानाने आपल्या घरावर फडकवावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले