बारामती येथील शरद सभागृह येथे जयहिंद फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनजागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष माधव भंडारी, आयकर विभागाचे उपायुक्त डॉ.सचिन मोटे, भारतीय वायू सेनेचे माजी एअर कमांडर डॉ. नितीन साठे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी २०२१ मध्ये शहीद झालेल्या १७ सैनिकांच्या वीरमाता व वीर पत्नींना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, साडी – चोळी व २१ हजार रुपयांचा चेक देवून सन्मानित करण्यात आले.१९७१ च्या भारत – पाकिस्तान युद्धात शहीद झालेले ज्ञानदेव लक्ष्मण पवार ( पवार वाडी, ता. इंदापूर) यांच्या वीर पत्नी सावित्रीबाई पवार ,( वय वर्षे ८० ) यांचाही या वेळेस यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला बेळगाव, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातून अनेक वीर पत्नी व वीर माता उपस्थित होत्या. ऑल इंडिया असोसिएशन ऑफ लिनेस क्लब बारामती यांच्या वतीने या सर्व 40 वीर पत्नींना साडी- चोळी देवून त्यांचे माहेरपण करण्यात आले. भारतीय लष्करात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांना आधार ,आपुलकी व आदर देण्याचे काम सदैव केले जाणार असल्याचे संदीप माने यांनी बोलताना व्यक्त केले.कार्यक्रमासाठी पूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या राष्ट्रप्रेमी नागरिकांनी खूप समाधान व्यक्त केले.आम्ही पण या चळवळीत सामील होऊ इच्छितो असा मानस व्यक्त केला.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयहिंद फाउंडेशनच्या बारामती,पुणे, फलटण,वाई, खटाव, सातारा,कोल्हापूर या टीमने तसेच जयहिंद फौंडेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल अनपट, राष्ट्रीय सचिव हनुमंत मांढरे, राष्ट्रीय संचालक डॉ. नितीन कदम, राष्ट्रीय संचालिका मनीषा अरबुने, बारामती शाखा अध्यक्ष राजेंद्र जगताप, उपाध्यक्ष सतीश झगडे, सचिव सचिन कुंभार, सल्लगार स्नेहलता जगताप, प्रा. प्रकाश कुंभार यांनी परिश्रम घेतले.