बारामती :(प्रतिनिधी रियाज पठाण.) दिं. १५ ऑगस्ट रोजी गुणवडी ता.बारामती जि. पुणे या शाळेत ‘आजादी का अमृत महोत्सवात ‘ भारताचा ७७ वां स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक सोपान काका बाराते यांनी ध्वजारोहण केले. सतपाल दादा महादेव गावडे यांनी अध्यक्षस्थान भूषवले.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सामुदायिक कवायत , देशभक्तीपर समूहगीते,सांस्कृतिक कार्यक्रम ,विद्यार्थी भाषणे सादर केली. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रामपंचायत गुणवडीच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमात आकर्षण ठरलेले बीएसएफचे जवान आकाश कांबळे यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव यांनी प्रास्ताविक केले. या पुढील कालखंडात ‘नवभारत साक्षरता मिशन’ राबविण्यात येणार आहे. याविषयी गावकऱ्यांना उद्बोधित केले.गावातील एकही मुल शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी एक सामाजिक जबाबदारी म्हणून सर्व गावकऱ्यांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे. त्यांना शाळेत दाखल करावे. याविषयीचे आवाहन केले.शाळेत राबवत असलेले गुणवत्ता वाढीचे वेगवेगळे उपक्रम याविषयी पालकांना जागृत केले. शाळेत मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी , त्याच्यातील आत्मभान जागृत करण्यासाठी , त्याच्यातील हुन्नर जोपासण्यासाठी वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. तेव्हा पालकांनी आपल्या पाल्याला गावातल्या शाळेतच दाखल करावे अशा प्रकारची विनंती त्यांनी केली.शिक्षण हे ‘वाघिणीचे दूध ‘आहे ते जो कोणी घेतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. इतिहास निर्माण केल्याशिवाय राहत नाही.त्यामुळे शिक्षण हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे हे समजून सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे. तरच आपल्या कुटुंबाचा , गावाचा ,पर्यायाने देशाचा विकास होणार आहे. अशा प्रकारचे विचार त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी शाळेतील उपशिक्षिका लक्ष्मी भरते मॅडम यांनी ‘निपुण भारत ‘ची प्रतिज्ञा सर्वांना दिली .याच कार्यक्रमात सारथी या संस्थेने विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप याविषयी माहिती दिली.निपूण भारत अंतर्गत स्थापन केलेल्या माता पालक गटातील हसिना मुजावर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात माता पालकांची जबाबदारी किती महत्त्वाची आहे हे विषद केले.अध्यक्षीय भाषणात मान. सतपाल दादा गावडे यांनी शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या बाबींवर प्रकाश टाकला. पुढील काळात शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करण्याचे अभिवचन दिले. उतरोत्तर प्रगती साधन्याचे आवाहनही केले.याप्रसंगी सुनिल कांबळे, कारभारी दादा गावडे यांनी मनोगत व्यक्त केले.महेंद्र भोसले उपशिक्षक यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत गुणवडीचे प्रशासकीय अधिकारी जगताप साहेब,पोंदकुले भाऊसाहेब,व त्यांचा सर्व स्टाफ. तलाठी कार्यालयाचे पारवे भाऊसाहेब व त्यांचा स्टाफ , व कृषी सहाय्यक मनिषा काजळे उपस्थित होत्या. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निता रणदिवे उपाध्यक्षा रेश्मा कांबळे गावातील बहुसंख्य ग्रामस्थ ,माता पालक , तरुणवर्ग उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविंद्र कदम,वृषाली उपळेकर , सुलोचना कोळी यांनी योगदान दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बारवकर यांनी केले.हर्षादेवी जगताप यांनी आभार मानले. शेवटी खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.