निवडणुक आचारसंहिता काळात बारामती शहर व तालुक्यातील सोशल मीडिया अकाउंट वर लक्ष ठेवून त्यांचे मॉनिटरिंग करणेबाबत माननीय पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्या होत्या. सदर सूचनांचे अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांना सावळ येथील आरोपी आकाश शेंडे हा धारदार कोयता बाळगून त्याचे इंस्टाग्राम अकाउंटला स्टेटस ठेवत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने आज रोजी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून स्टेटसला ठेवण्यात आलेला धारदार कोयता जप्त करण्यात आला. त्यानंतर सदर आरोपीच्या मोबाईल ची बारकाईने पाहणी केली असता त्याच्या मोबाईल मध्ये अग्निशस्त्र बाळगल्याचे फोटो मिळून आले. त्याबाबत त्याच्याकडे तपास करता त्याने सदरचे अग्निशास्त्र हे त्याचा साथीदार रोहित वनवे राहणार लाकडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्याकडे असल्याचे सांगितल्याने रोहित वनवे यास पोलीस पथकाने ताब्यात घेऊन त्याची पंचा समक्ष अंग झडती घेतली असता त्याचे ताब्यात एक सिल्वर रंगाचे अग्निशस्त्र व एक खाली पुंगळी मिळून आली. सदर आरोपीकडे अग्निशस्त्रबाबत विचारपूस करता त्याने सदरचे अग्निशस्त्र हे सागर भिंगारदिवे रा तांदुळवाडी यांच्याकडून सुमारे दोन महिन्यापूर्वी विकत घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस पथकाने भिंगारदिवे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे पीस्टल बाबत तपास करता ओंकार महाडीक याचेकडून प्राप्त केल्याचे सांगितले. सदर कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपी नामे आकाश शेंडे ,रोहित वनवे व सागर भिंगारदिवे यांना अटक केली आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांचे दैनंदिन सोशल मीडिया मॉनिटरिंग अशाच प्रकारे चालू राहणार आहे.
सदरची कारवाई ही श्री पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, श्री संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक बारामती , श्री सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी ,पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लेंडवे पो. हवा. राम कानगुडे, अतुल पाटसकर, बापू बनकर, पो. ना. अमोल नरुटे, पो.शि.तुषार लोंढे यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करीत आहेत.