तिरंगा ध्वज विक्री केंद्र
बारामती दि. 8: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार असून दौंड तालुक्यात प्रत्येक गावात विविध माध्यमातून तिरंगा ध्वजाची उपलब्धता करून देण्यात येत आहे.
दौंड तालुक्यात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महिला बचत गट, ग्रामसेवक, स्वयंसहाय्यता समुहाद्वारे आणि खाजगी विक्रेत्यांद्वारे गावोगावी तिरंगा ध्वजाची विक्री करण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ध्वज विक्रीचे नियोजन करण्यात आले असून स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडेही तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तालुक्यात घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. काही गावात राष्ट्रध्वज संहितेचे फलक लावण्यात आले आहेत, अशी माहिती गट विकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी दिली.
भारतीय स्वातंत्र्याला 75वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नागरीकांनी तिरंगा ध्वज खरेदी करावा. नागरीकांनी उस्फुर्तपणे ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमात सहभाग नोंदवून 13ऑगस्ट ते 15ऑगस्ट दरम्यान आपली घरे, संस्था यावर राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन श्री. येळे यांनी केले आहे.