बारामती दि. १४: महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहिम राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील या मोहिमेचा शुभारंभ बारामती येथील सिल्वर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला.
ही मोहीम १३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविली जाणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुनील पोटे, सहाय्यक संचालक डॉ. संजय दराडे, सहाय्यक संचालक कुष्ठरोग व क्षयरोग डॉ. हुकुमचंद पाटोळे, सिल्वर ज्युबिलीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे व सिल्वर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयातील पर्यवेक्षक, आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. भगवान म्हणाले की, कुष्ठरोग व क्षयरोग हे समाजाला लागलेले कलंक आहे. या रोगाबाबत समाजामध्ये गैरसमज आहेत. या विशेष मोहिमेद्वारे कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. घरोघरी सर्वेक्षण करून सापडलेल्या संशयित व्यक्तीची तपासणी करून मोफत औषधोपचार दिला जाणार आहे. कुष्ठरोग व क्षयरोग समुळ नष्ट करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असून ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन डॉ. पवार यांनी उपस्थितांना केले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी तालुक्यातील कुष्ठरोग व क्षयरोग बाबतची सद्यस्थिती सांगितली.