बारामती दि. 21: बारामती तालुक्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ राबविण्यात येत असून सर्व विभागणी सेवा पंधरवडा यशस्वी करावा, असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.
बारामती तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आदिराज मंगल कार्यालय येथे लाभार्थ्यांना विविध सेवांच्या वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे बोलत होते.
यावेळी तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार डॉ. भक्ती सरवदे- देवकाते विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी आदी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी श्री. कांबळे म्हणाले, आज जिल्ह्यात सर्व ठिकाणी महासेवा दिन साजरा करण्यात येत आहे. सेवा पंधरवड्यात एकूण 14 सेवांचा लाभ देण्यात येत आहे. सर्व विभागांनी प्रलंबित सेवांचा 2 ऑक्टोबर पर्यंत निपटारा करावा. लाभार्थ्यांच्या समस्यांचा जागेवरच सोडवाव्यात. लाभार्थ्यांना सेवा पंधरवड्याचा लाभ देवून सेवा पंधरवडा यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रस्ताविकात तहसिलदार विजय पाटील म्हणाले, बारामती तालुक्यात माहे डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे एकुण 35 पशुधन मयत झाले होते त्यांची नुकसान भरपाई रक्कम 4 लाख 54 हजार रुपये व 777 शेतकऱ्यांच्या शेतीपिक/फळपिकांची नुकसान भरपाई रक्कम 79 लाख 69 हजार 780 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरीत करण्यात आलेली आहे. या सेवा पंधरवड्यात तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबित सेवांचा निपटारा प्राधान्याने करण्यात येईल, असेही, त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 7 नॉनक्रिमीलिअर प्रमाणपत्र, 13 जातीचे व उत्पन्नाचे दाखले, 1 जन्म व मृत्यू प्रमाणपत्र,34 शिधा पत्रिका, महाडीबीटी पोर्टल कृषि यांत्रिकीकरण अभियानांतर्गत 3 ट्रॅक्टर, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत 5 लाभार्थ्यांना ज्वारी बियाणे व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेंतर्गत 3 लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण वितरण करण्यात आले
यावेळी 50 फेरफार नोंदीचा निपटारा करण्यात आला असून 1 मालमत्ता हस्तांतरण नोंद, 1 नव्याने नळ जोडणी, 4 मालमत्ता कराची आकारणी, 17 घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी, 21 पंतप्रधान किसान सन्मान निधी, 60 नवीन घर मालकांना विद्युत जोडणी, इत्यादी सेवा लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या. रमाई व पंतप्रधान घरकुल योजनेची प्रचार व प्रसिद्धीही यावेळी करण्यात आली.